गणेश कॉलनीतील एका छोट्या खोलीत महावीर क्लासचा प्रारंभ मी केला. सुरुवातीला ८/१० मुले होती. पण मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी माझी मेहनत करायची आणि मुलांकडून करून घ्यायची तयारी होती. त्यामुळे दरवर्षी निकालाच्या व मुलांच्या वाढीव गुणवत्तेच्या टक्केवारीमुळे विद्यार्थी संख्या विक्रमी वाढत गेली. पूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळात मेरिटमधील मुलांची यादी तयार होत असे. या मेरिटच्या यादीत नंबर मिळावा म्हणून मुले अत्यंत कठोरपण आणि परिश्रमपूर्वक मेहनत करीत. गुणवत्ता यादीत नंबर मिळवू शकतील अशा मुलांना आम्हीही जादा वेळ देत असू. मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची फळी आम्ही तयार केली. स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक हा पायंडा मी सुरू केला. या शिक्षकांना वेतनही त्याकाळात इतरांपेक्षा जास्त दिले. त्यामुळे ती मंडळीही मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी निष्ठेने काम करीत.