शालेय, महाविद्यालयीन
जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा
प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम,
प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की
व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा
गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि
परिश्रमही घ्यावे लागतात.
विद्यार्थी दशेतील युवकांना
यश मिळवणे म्हणजे, दहावी, बारावी, प्रवेश किंवा स्पर्धा परिक्षांमध्ये चांगल्या
गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. कोणत्याही परिक्षांत यश मिळविण्यासाठी
युवकांनी स्वतःला चांगल्या व उत्तम सवयी लावणे आवश्यक असते. सवयी या स्वतःच लावून
घ्यायच्या असतात, त्या दुसऱ्याकडून लावून घेता येत नाहीत. सराव, छंद, आवडीचे काम
अशा प्रकारे उत्तम सवयी लागतात.
चांगल्या सवयी लावण्याचे
काही गुरूमंत्र आहेत. त्याचे अनुकरण व अनुसरण केले की, जीवनात यशस्वी होण्याची
शक्यता वाढत जाते. प्रत्यंक यशाच्या मागे माणसाच्या व्यक्तिगत सवयी सुद्धा पूरक व सहाय्यिभूत
ठरतात. त्यातील काहींच्या संदर्भात आपण चर्चा करु या.
वर्षभराचा अभ्यास एका
बैठकीत नको
विविध प्रकारच्या
परिक्षांसाठी अनेक प्रकारची पुस्तके अभ्यासावी लागतात. ठराविक प्रकरणे असतात.
वर्षभराच्या शेवटी किंवा परिक्षेच्या अगोदर अभ्यास पूर्ण करुन घेवू असा
आत्मविश्वास बाळगून काही जण एकाच बैठकीत संपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे मानसिक, शारिरीक थकवा येतो. मेंदूची साठवण क्षमताही कमी होते. हा प्रकार
टाळण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने व मध्यांतर घेत अभ्यास करावा. शरिराच्या नव्या
ऊर्जेमुळे मनाची एकाग्रता होवून वाचलेला, चिंतन-मनन केलेला अभ्यास लक्षात राहतो.
वारंवार अभ्यासाचे नियोजन
करा
अभ्यासाचे नियोजन वर्षभराचे
केलेले असावे. तसा आलेख तयार करावा. मात्र विषयांचे येणारा कंटाळा किंवा त्यातील
तोच तोचपणा टाळण्यासाठी छोट्या छोट्या टप्प्यातही अभ्यासाचे नियोजन करावे लागते.
केवळ वाचन म्हणजे अभ्यास नव्हे. यात लेखन सराव सुद्धा आहे. आकृत्या वाचन व त्याचे
आरेखनही आहे. काही प्रकल्पही वेळीच पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्याही
वेळ अभ्यासात गृहीत धरावा. यासाठीच छोट्या छोट्या टप्प्यातही अभ्यासाचे वारंवार नियोजन
करावे.
रोजची वेळ निश्चित करा
आपल्या अभ्यासाची रोजची वेळ
निश्चित असावी. ती वेळ पाळण्याचा प्रयत्न करावा. विस्कळीत किंवा अनियमित वेळेत
अभ्यासाचा प्रयत्न केला तर अभ्यासही विस्कळीत होतो. त्याचे परिपूर्ण आकलन न होता
विस्मृती होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दिवसभरात अभ्यास केव्हा आणि
कितीवेळ करायचा याचे वेळापत्रक तयार करावे.
अभ्यासाचेही लक्ष निश्चित
करा
अभ्यास करायचा म्हणजे,
एकाचवेळी सर्व विषयांचा अभ्यास करायचा असे होत नाही. नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास
करायचा, कितीवेळ करायचा, कोणत्या प्रकरणापर्यंत करायचा हे निश्चित करावे.
त्यादृष्टीने वेळ देवून अभ्यासाला गतीही द्यावी. अभ्यास करताना त्याचे पुनर्विलोकनही
करावे लागते. अभ्यासासाठी केवळ पुस्तक हातात असणे, वाचणे असे करु नये. थोडे वाचन,
थोडे चिंतन, थोडे मनन आणि गरजेच्यावेळी लेखनही करावे. तसे केले तर अभ्यासाचा किती
बोध झाला हे लक्षात येते.
सर्वच विषयांचा अभ्यास
करावा
अभ्यासाचे वेळापत्रक तयार
केले की, ठरलेल्यावेळी, ठरलेल्या विषयाचा अभ्यास करावा. आपल्या आवडीच्या विषयाला
जादा वेळ आणि नावडत्या किंवा समजायला अवघड असलेल्या विषयाला कमी वेळ असे करु नये.
अभ्यासाचा निश्चिय, ध्येय ठरवूनच प्रत्येक विषयाला वेळ द्यावा. कोणत्याही
विषयासाठी चालढकल म्हणजे जावू दे, नंतर करु, परिक्षेच्यावेळी पाहू असे करु नये.
तसे केल्याने सर्व विषयांच्या अभ्यासाचे नियोजन चुकते. तो विषय अजून कठीण वाटायला
लागतो. त्याचे आकलन कमी होवून अभ्यासात त्रुटी निर्माण होतात.
कठीण विषयाला अगोदर प्रारंभ
करा
अभ्यासासाठी असलेल्या सर्व
विषयांपैकी जो विषय आपल्याला कठीण वाटतो, त्याच्या अभ्यासाला अगोदर हात लावावा.
जेव्हा आपण अभ्यासाला प्रारंभ करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा असते, मन प्रसन्न असते,
विचारांचे संतूलन असते. त्यामुळे कठीण विषयाला हात लावला की, तो विषय सोपा वाटायला
लागतो. त्यातील व्याख्या, सूत्रे, समिकरणे समजण्यास सोपी जातात. पहिल्या विषयाचा अभ्यास
सहजपणे लक्षात राहतो.
अभ्यासाचे पुनर्विलोकन करा
अभ्यास करण्यासाठी आपण
पाठ्यपुस्तक, इतर लेखकांच्या नोट्स, स्वतःची टीपणे वापरतो. त्यामुळे अभ्यास अचूक व
सर्व समावेशक होतो. काही विषयांचे आकलन पूरक वाचन केल्याने परिपूर्ण होते. अभ्यास
पक्का होतो. तो दीर्घ काळ स्मरणात राहतो. एखाद्या वाचनातून अनावधानाने सुटलेली
माहिती पूरक वाचनातून लक्षात येते. यासाछी अभ्यासाचे पुनर्विलोकन सतत करावे.
अभ्यासातील अडथळे ठरवून दूर
करा
पूर्वी युवकांच्या अभ्यासात
अडथळे फार कमी असत. मुलांच्या अभ्यासाच्या खोल्या स्वतंत्र नसल्या तरी त्याना
इतरांचा त्रास होत नसे. मात्र अलिकडच्या काळात प्रगत तंत्रामुळे युवकांच्या
वापराची अनेक साधने निर्माण झाली आहेत. त्यात व्यक्तिगत मोबाईलसह लॅपटॉप, टॅब याचा
वापर वाढला आहे. या उपकरणांशी संबंधित सवांद किंवा खेळाचे पर्याय वाढले आहेत.
कॉलिंग, मेसेजिंग, चॅटींग वाढले आहे. अभ्यासात या गोष्टी अटथळे आणतात किंवा
व्यत्यय निर्माण करतात. अभ्यासाला बसतातना या उपकरणांच्या वापराचे सर्व मार्ग
ठरवून व निर्धाराने बंद करावेत. अभ्यासाच्या वेळे व्यतिरिक्त त्यांच्या वापराची
वेळ निश्चित करावी.
अडचणी सोडविण्याचा संवाद
कोणत्याही अभ्यासात आकलनाशी
संबंधित काही अडचणी येवू शकतात. विषय समजून घेताना त्याचे स्पष्टीकरण लक्षात येत
नाही. अशावेळी आपल्या एखाद्या हुशार मित्राकडून विषय समजून घ्या. वेळप्रसंगी विषय
शिक्षकांशी संपर्क करून त्यांच्याकडे जावून विषय समजून घ्या. घरात पालकांनाही
संबंधित अडचण सांगा. इंटरनेटच्या माध्यमातून पूरक माहिती मिळवा. परिक्षेच्या
पूर्वी विषयाशी संबंधित शंका, अपसमज मनात ठेवू नका.
मनोरंजन मुळीच बंद करु नका
अभ्यासाचे रोजचे नियोजन
कठोरपणे व निश्चितपणे पाळा. त्यात चालढकलपणा करु नका. मात्र अभ्यासाच्या सोबत आपले
व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी शारिरीक व मानसिक इतरही गरजा पूर्ण करणे आवश्यक
असते. एखाद्या परिक्षेतून एखाद्या विशिष्ट गोष्टीचे यश मिळते. मात्र, माणसाच्या
संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर त्याला खेळ, मनोरंजन, छंद, वाचन,
वादविवाद, कला, साहित्य आदी प्रांतातील वावर आवश्यक असतो. अभ्यासाच्या काळातही
यातील अनेक गोष्टींसाठी आपण ठरवून वेळ देवू शकतो. सात दिवसांच्या नियोजनात आपल्या
इतर आवडत्या गोष्टीसाठी एखादा दिवस राखून ठेवू शकतो.

खूपच उपयोगी माहिती आहे
ReplyDelete