Skip to main content

वडीलांच्या संस्कारांची पुण्याई

जवरीलालजी गादिया, सौ. लिलाबाई यांच्या सह नात दर्शना व नातू धर्मेश
हाय फ्रेंड्स

चिंतन या नावाने मी माझा ब्लॉग लिहायला सुरवात करतोय. चिंतन एवढ्यासाठीच की, गेल्या २८ वर्षांच्या व्यावसायिक आणि सामाजिक वाटचालीत अनेक अनुभवांचे संचित मनात साचले आहे. त्याला व्यक्त करण्यासाठी मी जागा शोधत होतो. ब्लॉग सारख्या माध्यमातून जगाच्यास्तरावर गप्पा मारायला उपलब्ध असलेल्या संधीचा वापर करून घेण्याची मला ईच्छा झाली. या माध्यमाला गती आणि सर्वाधिक पोहच आहे हेही लक्षात घेतले. अखेर चिंतन नावाने ब्लॉगचा श्रीगणेशा करीत आहे. 

 कोठून लिहायला प्रारंभ करावा हा प्रश्न असतो. अनेक प्रसंग समोर असतात. प्रत्येकाचे काहीना काही महत्त्व असते. अशा या भावनिक गोताळ्यात मला माझे वडील स्व. जवरीलाल दलिचंद गादिया यांच्याकडून मिळालेल्या कौटुंबिक, नैतिक व सामाजिक संस्कारापासून प्रारंभ करण्याची ईच्छा होते. प्रत्येक मुलासाठी आई-वडील संस्कार शाळा असतात. त्यातूनच आपले व्यक्तिमत्त्व घडते आणि विस्तारते. माझ्याबाबतीत सांगायचे तर मी वडीलांच्या संस्काराचा वसा घेवून उभा आहे, हे प्रांजळपणे सांगतो.

वडील जवरीलालजी गादिया आणि आई लिलाबाई यांचा संसार सुरवाडे (ता. बोदवड) येथे सुरू झालेला. कालांतराने आम्ही चार भावंडे. दोन भाऊ, दोन बहिणी.  आमच्या कुटुंबाच्या नशिबी अठराविश्वे दारिद्रय होते. वडिलांकडे २१ एकर कोरडवाहू शेतजमीन होती. ती बाराही महिने कर्जात बुडालेली. पीकासाठी कर्ज घ्यायचे आणि पीक आल्यावर व्याजासह कर्ज फेडायचे, असे चक्र होते. मला आजही चांगले आठवते, रोजच्या जेवणासाठी काहीतरी व्यवस्था करण्यासाठी वडीलांना प्रयत्न करावे लागे. आई आम्हाला म्हणायची, थांबा वडील पैशांची व्यवस्था करून येतील. 

आमची स्थिती अशी असली तरी आमच्याकडे येणाऱ्या इतर लोकांची ये-जा रोजचीच होती. जवळचे, दूरचे नातेवाईक, गावात येणारे तलाठी, वायरमन, शिक्षक, मलेरिया सर्वेक्षक अशा सरकारी लोकांचे जेवणही आमच्याकडे असे. वडील कोणतीही कुरबूर न करता व्यवस्था करीत. वडील परिस्थिति विषयी त्रागा करीत नसत आणि आईची तक्रार नसे. जे आहे त्यात ती चांगले करीत असे. या संस्काराचा वसा मी दोघांकडून घेतला. मी आजही व्यवसाय, कुटूंब व समाज कार्यात कोणतीही तक्रार न करता आपले काम करीत असतो.

आमच्याकडे नेहमी कोणीतरी येत असे. त्यामुळे वडीलांनी आम्हा भावंडांना प्रत्येकाला नमस्कार करण्याची सवय लावली होती. आजही ही सवय आम्ही आचरणात ठेवली आहे. नमस्कार करण्यामुळे मला मोठ्यांच्यासमोर नम्रतेने वागण्याची आणि इतरांचा आदर करण्याची सवय लागली.

वडीलांनी नाते संबंध सतत जपले. कोणत्याही जवळच्या,दूरच्या नातेवाईकाकडे लग्न, वाढदिवस, मृत्यू असे कोणतेही कार्य असले की वडील हमखास जात. हातात पैसा नसला की उसनवारी करीत. ही उसनवारी व शेतीचे कर्ज फेडण्यात पीकाच्या हंगामाचे उत्पन्न जायचे. पुन्हा नवे कर्ज काढून चक्र सुरू असायचे. 

वडीलांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य  होते. ते नातेवाईक किंवा परिचितांमध्ये कधी कोणाला दोष लावत नसत. कोणाची चुगली-चपाटी करीत नसत. ज्यांच्या गोष्टी त्यांच्यापर्यंतच ठेवत. त्यामुळे वडीलांविषयी नातेवाईक व परिचितांमध्ये आपलेपणा होता. विश्वास होता. हा संस्कार माझ्याही कुटुंबात आम्ही जपला आहे. 

दुसऱ्यांची उसनवारी पहिल्यांदा चुकती करा, भले पुन्हा कर्ज मागा हाही संस्कार वडीलांनी दिला. आज माझ्या व्यावसायिक यशात आम्ही सचोटी आणि वेळेवर व्यवहार हे सूत्र पाळले आहे. माझा व्यवसाय विद्यार्थांना शिकवणी देण्याचा आहे. त्यात मी विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेतो. अनेक विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत, गरजवंतांना मोफत शिकवणी असे प्रकार असतात. त्याची फारशी चर्चा मी करीत नाही.

मी ७ वी पर्यंत गावात शिकलो. ८ वी ते १० वी बोदवडला शिकलो. माझे मोठे भाऊ १० वी केल्यानंतर जळगावला आले. त्यांच्यामुळे मलाही जळगावला यायला मिळाले. मी जळगावलाच ११ वी, १२ वी केले. आम्ही दोघे भाऊ हॉटेल नटराजमध्ये दरमहा ४० रुपये देवून निवासाला होतो. आमचा तेथे रोजचा मुक्काम रात्री ९ ते सकाळी ६ असा असे. बाकी दिवसभर भाऊ नोकरीत आणि मी कॉलेज व इतर कामात असे. मी काहीवेळा जे. एम. पी. मार्केटसमोरील हातगाड्यांवर दिवस घालवत असे. वडीलांनी आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा शिक्षणाला पैसाही खूप कमी लागत असे. मला आठवते, वडील आमच्यासह इतरांना सांगत गावाबाहेर जा. शहरात जा. तरच प्रगती होईल. वडीलांनी आम्हाला असेच पाठबळ दिले. नुसते बाहेर जा असे नाहीतर तेथे जावून टीकून राहा, असेही वडील बजावून सांगत. त्यांच्या या सल्ल्यास अनुसरून मी जळगावला आलो आणि अनंत अडचणींना सामोरा जात शिकवणी वर्गाच्या व्यवसायात टिकून राहिलो. 

मी १९८५/ ८६ च्या सुमारास बीएस्सी (फिजिक्स) केले. एमएस्सीला प्रवेश घेतला होता. आम्ही कॉलेजमधील मुले एका चहावाल्याकडे जमत. तेथे कोणीतरी सांगितले की, गजानन क्लासमध्ये शिक्षकाची गरज आहे. तो क्लास शेवडेसर चालवत. त्यांच्या क्लासची जागा होती सध्याचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा पद्मश्री विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या घरामागील आऊट हाऊस. मी लगेच त्यांच्या भेटीला तेथे गेलो. तेव्हा ते कोकणात गेले होते. जूनमध्ये परत येतील असे समजले. मला पैशांची आवश्यकता होतीच. मी जूनमध्ये शेवडेसरांना भेटलो. त्यांनी मला दरमहा शंभर रुपये मानधन देवून क्लासमध्ये विषय शिकवायचे काम दिले. यामुळे एम एस्सी पूर्ण करायचे राहीले. शिकवणी वर्गात गरजेनुसार सर्व विषय शिकवावे लागत. मी एक वर्ष पूर्ण केले. दुसऱ्या वर्षी त्यांनी दरमहा दोनशे रुपये मानधन दिले. तेही वर्ष पूर्ण केले. मात्र, तिसऱ्या वर्षी शेवडेसर म्हणाले, नंदू आता तू तुझा क्लास सुरू कर. 

१९८७ मध्ये २०/२५ मुलांना घेवून मी महावीर क्लास सुरू केला. तेथे लावण्यासाठी लाकडी फळा मला शेवडेसरांनी दिला. त्यांच्याच हाताने विधीवत पूजन झाले. वडीलांनी संबंध जोडून ठेवण्याचा दिलेला संस्कार मला असा उपयोगी ठरला. नंतर दोन वर्षांत क्लासमधील विद्यार्थी संख्या १०० झाली. वडील दोन वर्षे माझी धडपड पाहात होते. माझे कसे होणार ही त्यांना चिंता असे. 

दीडवर्षे मी स्वतंत्र क्लास चालविल्यानंतर कल्पनाशी माझे लग्न झाले. लग्नानंतर सासरी आलेली कल्पना पहिल्यांदा माहेरी जायला निघाली तेव्हा ती वडीलांना नमस्कार करायला गेली. तेव्हा वडील म्हणाले, तू माहेरी जा. पण तेथे कोणाकडे काहीही मागू नकोस. तुला काय हवे असेल ते येथे सासरी  माग. हे ऐकून कल्पनाच्या डोळ्यांत पाणी आले. कारण तो काळमुलींच्या माहेरकडून हुंडा, भेटवस्तू, रोकड मागण्याचा होता. कल्पनाला उलट वडील म्हणत होते तू माहेरहून काही आणू नको. आजही वडीलांची ही आठवण काढली तर तीचे डोळे ओलावतात. कल्पनाला वडीलांचा सहवास केवळ दीड महिने लाभला. त्यांनी तिला मुलीप्रमाणेच वागणूक दिली. 

वडीलांच्या अनेक संस्कारांचे संचित आज गाठीला आहे. दारिद्रय अनुभवले आहे. त्यामुळे आज महावीर क्लासमधून हजारो विद्यार्थ्यांना शिकवणी देताना मी खूप लवचिक भूमिका घेतो. आमच्या शुल्कासाठी कोणाचेही शिक्षण थांबू नये हाच माझा हेतू असतो. असे करीत वडीलांची स्मृती आणि संस्कार जपत आसल्याचे मला समाधान मिळते.
 
आज एवढेच. भेटू पुन्हा लवकर.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांना अभ्यासाच्या उत्तम सवयी कशा लावाव्यात ?

शालेय, महाविद्यालयीन जीवनातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील परिक्षेला सामोरे जावून य़श मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. यश मिळवणे तसे अवघड असले तरी सातत्याचे परिश्रम, प्रयत्न व चिकाटी लक्षात घेता यश मिळवणे तसे सोपेही असते. परिक्षेतील असो की व्यवहारातील असो कोणतेही यश मिळविण्यासाठी नियोजन, सूत्र, आखणी आणि निश्चित दिशा गरजेची असते. यशाचे अंतिम ठिकाण निश्चित असले की तसे प्रयत्न केले जातात आणि परिश्रमही घ्यावे लागतात.   

मुलांसह पालकांचे कौन्सिलींग आवश्यक

दहावी, बारावीनंतर पाल्यांचे करियर कोणत्या क्षेत्रात घडवावे असा प्रश्न पालकांना असतो. याबरोबरच विद्यार्थी सुद्धा कोणत्या शाखेकडे जावे याविषयी साशंक असतात. दहावी, बारावीच्या परीक्षेत कितीही गुण मिळाले तरी पुढील पदवी शिक्षणाची दिशा निवडताना सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य होवून बसले आहे. याशिवाय उच्च शिक्षणाशी संबंधित प्रवेश प्रक्रिया फार गुंतागुंतीची होत चालली आहे. अशा प्रवेश परीक्षांचे प्रवेश अर्ज भरण्यापासून तर कॉलेजसाठीचा चॉईस निवडण्यापर्यंत अनेक अडथळे विद्यार्थी व पालकांना पार पाडावे लागतात. हा सर्व अनुभव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या कल चाचण्या घेणे आणि त्यावरुन त्यांच्या आवडीचे किंवा गुणवत्तेचे क्षेत्र निवडणे सोपे जाते.  

लहानांच्या कार्याची मोठी सावली ...

सुहास गोपीनाथ वयाचा आणि माणसाच्या व्यावहारिक चातुर्याचा फारसा संबंध नसतो. अनुभवांचा आणि अंगीभूत कौशल्यांचाही फारसा संबंध नसतो. कधी कधी व्यवहार आणि कौशल्ये ही उपजत असतात. त्याला गॉडगिफ्ट असेही आपण म्हणतो. वयाने लहान असलेल्या व्यक्ति कधीकधी असे कार्य करतात की, सामान्य माणूस अचंबित होतो. अशाच तरुणांच्या कार्याचा आदर्श नंतर इतरांसाठी मार्गदर्शक ठरतो. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. लहान वयात केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना ओळख मिळाली. त्यांची उदाहरणे घेवून इतरही मंडळी उभी राहिली. सध्या अशी काही नावे चर्चेत आहेत. त्यांच्याविषयी आपण बोलू या...