![]() |
सुहास गोपीनाथ |
वयाचा आणि माणसाच्या व्यावहारिक चातुर्याचा फारसा संबंध नसतो. अनुभवांचा आणि
अंगीभूत कौशल्यांचाही फारसा संबंध नसतो. कधी कधी व्यवहार आणि कौशल्ये ही उपजत
असतात. त्याला गॉडगिफ्ट असेही आपण म्हणतो. वयाने लहान असलेल्या व्यक्ति कधीकधी असे
कार्य करतात की, सामान्य माणूस अचंबित होतो. अशाच तरुणांच्या कार्याचा आदर्श नंतर
इतरांसाठी मार्गदर्शक ठरतो. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. लहान वयात केलेल्या
कामगिरीमुळे अनेकांना ओळख मिळाली. त्यांची उदाहरणे घेवून इतरही मंडळी उभी राहिली.
सध्या अशी काही नावे चर्चेत आहेत. त्यांच्याविषयी आपण बोलू या...
अवघ्या १४ व्यावर्षी
स्वतःची कंपनी स्थापन करुन सीईओ झालेल्या सुहास गोपीनाथ याची सध्या चर्चा आहे.
अंगीभूत गुणांच्या बळावर एक वेबसाईट तयार करणारा सुहास हा वर्षभरात कोट्यवधी रुपये
कमावणारा भारतातला लक्षवेधी सीईओ बनला आहे.
बंगळुरू येथे दि. ४ नोव्हेंबर १९८६ रोजी
जन्मलेल्या सुहासच्या वयाचा आणि त्याने
आतापर्यंत मिळविलेल्या यशाचा
कुठेच ताळमेळ बसत. अर्थात,
हे यश सुहासला सहजासहजी मिळालेले नाही. त्यांचे
कुटूंब मध्यमवर्गीय आहे.
वडील आर्मीत साईंटीस्ट असून आई हाऊस वाईफ आहे. सुहासचे शिक्षण एअर फोर्सच्या शाळेत
झाले. पशू विज्ञान हा त्याच्या आवडीचा विषय होता. घरात कम्पुटर नव्हता. त्याला
मित्रांकडून कम्पुटर व इंटरनेटविषयी माहिती मिळाली. नेटवर सर्फिंग करण्यासाठी तो
सायबर कॅफेत जावू लागला. त्यासाठी पालकाकडून दरमहा केवळ १५ रुपये मिळत. एवढ्या
पैशांत नेट सर्फिंगचा खर्च निघत नसे. तो ज्या सायबर कॅफेत जात असे ते दुपारी १ ते
४ बंद असे. सुहासने सायबर कॅफेच्या मालकाला सांगितले की, मी दुपारी १ ते ४ सायबर
कॅफे सांभाळतो. त्या बदल्यात मला मोफत इंटरनेटचा वापर करू द्यावा. मालकाने ते
मान्य केले आणि सुहास नोकरीवर लागला. इंटरनेटचा वापरही करू लागला. शाळा
सुटल्यानंतर तो तेथे काम करीत असे. तेव्हा सुहासचे वय होते १२ वर्षे.
इंटरनेटवर सर्फिंग करता
करता सुहास वेब डिझाइनिंग शिकला. त्याच्या सोबत तो वेबसाईट तयार करायला शिकला.
त्याला याच कामात आवड निर्माण झाली. तो सातत्याने काम करु लागला. कामात सतत
सुधारणा करुन गुणवत्ता वाढवू लागला.
वयाच्या १३ व्या वर्षी
त्याने फ्रिलान्स मार्केट डिरेक्टरीत वेब बिल्डर म्हणून नोंदणी केली. त्याने पहिली
वेबसाईट मोफत तयार केली. कारण तेव्हा त्याला कोणताही अनुभव नव्हता. मात्र, दुसरी
वेबसाईट तयार करताना त्याला १०० डॉलर मेहनताना मिळाला. त्यानंतर त्याच्याकडे
वेबसाईट डिझाईन्सची अनेक कामे येवू लागली.
अमेरिकेतील एका कंपनीने
सुहासला पार्ट टाईम जॉब ऑफर केला. तेव्हा सुहासचे वय १६ वर्षे होते. सुहासने तो
जॉब नाकारला. त्याने स्वतःची ग्लोबल्स एनआयसी (ग्लोबल्स इनकार्पोरेट) कंपनी सुरू
केली. ही कंपनी त्याने अमेरिकेत कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीत रजिस्टर केली.
कारण भारतात वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच कंपनी रजिस्टर करता येते. तेथे
अवघ्या १५ मिनिटात सुहासची कंपनी रजिस्टर होवून तो अध्यक्ष व सीईओ बनला तर त्याचा
मित्र संचालक बनला.
सुहासला वेबसाईट डिझाईन्सची
काही कामे मिळाली. त्याचे पहिल्या वर्षाचे उत्पन्न होते अवघे १ लाख रुपये. दुसऱ्यावर्षी
ते झाले ५ लाख रुपये. मात्र, सुहासला अशा प्रकारच्या कामात रस येत नव्हता. त्याने
अमेरिकेच्या बाहेर जावून स्पेन व इटलीत वेब डिझाईन्सचे काम शोधले. तेथे कंपनीची
शाखा सुरू केली.
सुहास जेव्हा १७ वर्षांचा
होता, तेव्हा तो भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना
भेटायला गेला. त्याला भेटीसाठी १५ मिनिटे मिळाली होती. प्रत्यक्षात दीडतास चर्चा
सुरू राहिली. वयाच्या १८ व्या वर्षी सुहाने ग्लोबल्स एनआयसी ची नोंदणी भारतातही
केली. या कंपनीचे भारतातील ऑफिस त्याने त्याच सायबर कॅफेजवळ सुरू केले, जेथे तो
काम करीत होता. या ऑफिसमध्ये त्यांने ४ लोकही नेमले.
एकिकडे स्वतःची कंपनी सुरू
करणारा सुहास नंतर शाळेकडे दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे तो १० वीत असताना गणितात
नापास झाला. हा निकाल पाहून त्याचे पालक भांबावले. त्यांनी त्याला अभ्यासाची सक्ती
करुन कंपनीच्या कामापासून ४ महिने लांब ठेवले. नंतर सुहास १० वी प्रथम श्रेणीत
उत्तीर्ण झाला. पालकांच्या आग्रहाखातर त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. मात्र,
तो ५ व्या सेमिस्टरला असताना त्याला वर्ल्ड बँकेने एका कार्यक्रमात सहभागासाठी
बोलावले. तो १८ व्या वर्षी वर्ल्ड बँकेचा सल्लागार संचालक झाला. त्याचे अभियांत्रिकी
शिक्षण अर्धवट राहिले.
वयाच्या १४ व्या वर्षापासून
तर १८ व्या वर्षांत पोहचेपर्यंत सुहासने अनेक सन्मान व बक्षीसे मिळविली आहेत.
त्यात २००७ मध्ये युरोपियन संसदेचा यंग अचीव्हर
अवॉर्ड, २००८ -०९ दरम्यानचा वर्ल्ड
इकॉनॉमिक फोरमने दिलेला यंग ग्लोबल लीडर्स अवॉर्ड याचा समावेश आहे. सुहास आज भारतासह जगातील १४ देशांतील ५०० हून जास्त कर्मचारी असलेल्या ग्लोबल्स
इनकॉर्पोरेट या कंपनीचा अध्यक्ष
आणि सीईओ आहे. बीबीसी, वॉशिंग्टन
टाइम्स, दि एज आदींनी जगातील सर्वात कमी वयाचे
सीईओ म्हणून त्याचा गौरव केला आहे.
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणि गिनिज बुक ऑफ रेकॉर्डच्या भारतीय आवृत्तीत
जगातील कमी वयाचा सीईओ म्हणून सुहासची नोंद आहे.
भारतीय माध्यमे सुहासला हिंदुस्थानी बिल गेट्स म्हणून संबोधतात. कारण सुहास हा आपले प्रेरणास्त्रोत म्हणून बिल गेट्सचा उल्लेख करतो. एकदा बिल गेट्स बंगळुरू येथे आले असता सुहास आणि त्यांची भेट झाली होती. तेव्हा बिल गेट्सही त्याला म्हणाले होते की, मी तुझ्या पासून सावध राहीले पाहिजे कारण तुझी महत्त्वाकांक्षा माझ्यासारखीच आहे. सुहास हा आजही वडिलांकडून पॉकेटमनी घेतो कारण त्याचे पाय जमीनीवर असून त्याला यशाचा अभिमान किंवा कैफ चढलेला नाही. सुहासच्या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल आहे १० कोटी रुपये.
![]() |
१४ वर्षांचा श्रवण व १२ वर्षांचा संजय |
सुहासच्या कहाणी प्रमाणेच
चेन्नई येथील १४ वर्षांच्या श्रवण व १२ वर्षांच्या संजयने कमाल केली आहे. हे दोघे
भाऊ मोबाईल ऍप डेव्हलपर म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रवण कंपनीचा अध्यक्ष आहे तर संजय
हा सीईओ आहे. दोघांना भारतातील बाल करोडपती म्हटले जाते. हे दोघे भाऊ फेसबुकचे
सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गला देखील भेटले आहेत. दोघांचे वय कमी असल्यामुळे भारतात
त्यांच्या नावे कंपनीची नोंदणी करता आलेली नाही. मात्र, नातेवाईंकाच्या नावावर
त्यांनी कंपनी नोंदली आहे. २०११ मध्ये त्यांनी गो डायमेन्शन नावाचे ऍप लॉन्च केले.
हे ऍप ऍपल प्लो स्टोअर व गुगुल प्ले स्टोअर्सवर उपलब्ध आहे. दोघा भावांनी
आतापर्यंत ११ मोबाईल ऍप तयार केले आहेत.
![]() |
सिंधुजा राजारामन |
अशीच एक छोटीची मोठी सावली
आहे. ती म्हणजे, सिंधुजा राजारामन. वयाच्या नवव्या वर्षी
सिंधुजा ही वडिलांकडून कार्टून काढायला शिकली. वयाच्या १४ व्या वर्षी ती जगातली
दुसरी तरुण सीईओ बनली. ऍनिमेशन तयार करणारी तीची कंपनी स्पेनमध्ये रजिस्टर झालेली
आहे. मात्र, ती सर्व काम चेन्नईत बसून करते. तीच्या सोबत १० जण काम करतात.
सिंधुजाची कंपनी शॉर्ट फिल्म व ऍनिमेटेड फिल्म्स तयार करतात.
वरील सर्व कहाण्या या लहान
मुलांच्या आहेत. ज्या वयात त्यांनी खेळावे बागडावे असे वाटते होते, त्या काळात ती
मुले व्यावहारिक शहाणपण व चातुर्य शिकली. त्यांच्या वयापेक्षा त्यांच्या कार्याची
सावली मोठी झाली. म्हणूनच पालकांनी अशा मुलांच्या स्टोरीज् पाल्यांना आवर्जून
संगितल्या पाहिजेत.
मला अजून एक संदर्भ आठवतो.
तो म्हणेज, बिझीनेस टुडे या आघाडीच्या मासिकाने गतवर्षी भारतातील टॉपच्या ४०
सीईओंची यादी तयार केली आहे. त्या यादीत ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची नावे
जास्त आहेत. म्हणजेच, आजच्या पिढीत आयुष्यातील शिखरे पादाक्रांत करण्याची चढाओढ
वाढते आहे. अशा वातावरणात आपल्या पाल्यांवर बालवयातूनच योग्य संस्कार करण्याकडे
पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. सांगता येत नाही की, भारतातही बिल गेट्स, मार्क
झुकेरबर्ग तयार होतील ...
Comments
Post a Comment