पाल्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा हंगाम हाच आहे. त्यामुळे पाल्यांसह पालक मंडळीही तणावात असते. प्रत्येक परीक्षेच्या तयारीचे वातावरण जवळपास सुद्धा सारखे असते. कारण परीक्षा साधी, सोपी असत नाही. ती तशी कठीण असते. पाल्याने अभ्यास व्यवस्थित केला व पालकांनी करुन घेतला तर परीक्षा सोप्या असतात व निकाल गुणवत्तेचा लागतो. अभ्यासाची तयारी शाळा, महाविद्यालयासह काही खासगी वर्गांमधून करवून घेतली जाते. खासगी वर्गात पाल्यांकडून तयारी करुन घेण्यात शिस्त व सराव असतो.
पाल्यांचा घरी अभ्यास घेताना वातावरण अनुकूल असावे. त्यासाठीचे संपूर्ण साहित्य उपलब्ध असावे. अभ्यासाची पद्धत व वेळापत्रक निश्चित हवे. पाल्यांना अभ्यास विषयक सवयी सुद्धा कशा लागतील यावर पालकांचे लक्ष हवे. आजकाल क्रमिक पुस्तकांपेक्षा पूरक पुस्तकांमधून माहिती जास्त दिली जाते. दृकश्राव्य माध्यमांचा वापर करीत आशय समजून देण्याकडे शिक्षकांचा कल असतो. घरीही यूट्यूब, एनपीटीएल लेक्चरचा वापर करुन सराव करुन घेता येतो. अभ्यासाकरिता पाल्यांची बैठक व्यवस्था आरामदायी हवी. तेथे प्रकाश व्यवस्था पुरेशी हवी. या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील तर पाल्य जास्तवेळी अभ्यासात रमतात. पाल्यांना हसत, खेळत व अधुन मधून करमणूक करुन घेत अभ्यास करायला लावावा.
पाल्याचा आधार व्हा
शाळेच्या बाहेर कोणताही पाल्य हा जास्त वेळ पालकांच्या सहवासात असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास ही पालकांसाठी तणावाची बाब असते. कोणत्याही अभ्यासाचे आकलन होणे किंवा ते स्मरणात राहणे यासाठी पाल्यांच्या मेंदुचा कस लागतो. अशावेळी पाल्यास समजून घेत त्याला सहकार्य करीत आधार देण्याचे काम पालकच उत्तमपणे करुन शकतात. पाल्यांकडून फार अपेक्षा करु नये. पाल्याच्या कोणत्याही निकालाविषयी आनंद असावा पण काही चुकत असेल तर समजदार व क्षमाशिल स्वभावही असावा.
अनुकूल पर्याय
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना एकच एक विषयाचा अभ्यास वारंवार करणे हे नुकसानकारक असते. एखाद्या अतीतटीच्या परीक्षेसाठी असे करता येते. पण परीक्षा ही सर्वांगिण विकासाची असते. केवळ गृहपाठ किंवा पुस्तकी अभ्यास यातच पाल्य वेळ देत असेल तर तेही योग्य नाही. अशा वेळी पालकांनी पाल्यास खेळ व मनोरंजनाकडे नेले पाहिजे. पाल्यांना मैदानापासून दूर करुन कोणताही अभ्यास पूर्ण होत नाही. अभ्यासाच्या पलिकडेही आयुष्य असते हे पालकांनी लक्षात घ्यावे व पालकास समजून सांगावे.
परिपूर्ण आहाराची सवय
पाल्यांच्या परीक्षांच्या काळात त्यांना परिपूर्ण आहार देण्याकडे पालकांनी जाणिवपूर्वक लक्ष द्यावे. शरिराच्या सोबत मानसिक जडण घडणही आहारावर अवलंबून असते. कधीकधी अभ्यासाचा अती ताण, चुकीची पद्धत आणि त्यात अपोषक आहोर यामुळे पाल्यांना आजार संभवतात. पाल्य पालकांचे अनुकरण करीत आजार अंगावर काढतात. पालकही त्यांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पाल्यांचा पोषक आहार कसा असावा याविषयी पालकांनी तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.
कोणतीही तुलना टाळा
आजकालचा पालक पाल्यांशी चर्चा करताना अनेक गोष्टींची इतरांशी तुलना करतो. कधीकधी आदर्श म्हणून माहिती देणे हे योग्य असते. पण पाल्यांच्या प्रत्येक गोष्टींची तुलना वारंवार इतरांशी करणे ही बाब पाल्याचे मानसिक विश्व उध्वस्त करु शकते. खरे तर पालकांनी मुलांमध्ये स्व अस्तित्व तयार करावे. त्याच्यातील न्यूनगंड दूर करावेत. इतरांशी तुलना टाळून पाल्यातील स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा.
अवास्तव अपेक्षांचा ताण नकोच
आपल्या पाल्याचे करिअर उत्तम घडावे असे प्रत्येक पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, पाल्याच्या शारिरीक व मानसिक क्षमता त्यासाठी कितपत पूरक आहे याचा विचार क्षमता विकास चाचणीच्या माध्यमातून समजतो. अशा चाचण्या अधुनमधून केल्या पाहिजेत. काहीवेळा आपण अभ्यासाचा अतिरेक करीत पाल्यांमधील सुप्त गुणांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, अभ्यासाच्या बाबतीत अवास्तव अपेक्षा करायला लागतो. आपल्या पाल्य बुद्धीमानच आहे हा असाच एक गैरसमज असतो. काही पाल्य बुद्धीने कमी असले तरी कला गुणांमध्ये अतिसाधारण असतात. कोणी खेळात प्राविण्य मिळविते. पोहणे, खेळणे, कराटे, चित्र, नाट्य, गायन, अभिनय अशा कलांमध्ये पाल्य निपुण असतात. पाल्यांतील या सुप्त गुणांकडे दुर्लक्ष करीत आपण त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादत जातो. त्यामुळे पाल्यांचे स्वतःचे भावविश्व उध्वस्त होते.
पाल्यांचा घरी अभ्यास घेणे ही कुटुंबातील प्रत्येकाची सामायिक जबाबदारी आहे. आपल्या घरात अभ्यासाकरिता पूरक वातावरण निर्माण करणे ही पालकांची निरंतर भूमिका आहे. पाल्य हा पुस्तकी अभ्यासात प्रगती करु शकतो. पण, त्याच्या प्रगतीची साधने व वातावरण निर्मिती ही पालकांनी करायला हवी. परिक्षा देणारा एकटा पाल्य नसतो. त्याच्या सोबत सर्व कुटुंबच परिक्षा देते असते. त्यामुळे चांगल्या निकालाच्या अपेक्षा करणाऱ्या पालकांची स्वतःच्या जबाबदारीतून सुटका होवू शकत नाही.
Comments
Post a Comment