महावीर क्लासेसचे काम करीत
असताना इतरही अनेक संस्थांमध्ये मुला-मुलींच्या कौन्सिलिंगला मला जावे लागते. तेथे
विद्यार्थी-विद्यार्थिनिंशी संवाद साधावा लागतो. त्यांची आवड, निवड व सवयी लक्षात
घेवून विषयांची मांडणी करावी लागते. आजच्या मुलांचे जसे नियमित शिक्षण, अभ्यासाचे
प्रश्न आहेत तसेच त्यांच्या मानसिक जडण-घडणचेही प्रश्न आहेत. आर्थिकस्तर उच्च
श्रेणीत असलेल्या पाल्यांचे व अर्थिकस्तर अगदीच बेताचा असलेल्या पाल्याचे प्रश्न
वेगवेगळे असतात. आर्थिकस्तर उच्च असेल तर पालक मानसोपचारतज्ञांकडे पाल्यास घेवून
जातात. परंतु, अगदीच खालच्या आर्थिक स्तराखालील पाल्यांचे मानसिक विश्व अनेक
प्रकारच्या न्यूनगंडांनी भरलेले असते. असे न्यूनगंड काढायचे असतील किंवा दूर
करायचे असतील तर पाल्यांशी संवाद जाणिवपूर्वक विषयांचे नियोजन करून करावा लागतो. अशाच
प्रकारचा अनुभव मला जळगाव येथील महात्मा गांधी हरिजन कन्या छात्रालयातील विद्यार्थीनींशी
बोलताना जाणवला.
या छात्रालयात मागास व
आर्थिक दुर्बल घटकातील मुली निवास करून इतर शाळांमध्ये शिक्षण घेतात. घरी
अठराविश्वे दारिद्र्य असूनही बहुतांश मुली जिद्दीने शिक्षण घेत असल्याचे त्यांच्याशी
बोलताना लक्षात येते. काही दिवसांपूर्वी मी या मुलींशी सहजपणे गप्पा मारायला गेलो.
तेव्हा त्यांच्या मनातील भीती, न्यूनगंड किवा अपसमजांविषयी काही मुद्दे लक्षात आले.
चर्चेत एका मुलीने
स्वतःच्या आणि कुटुंबाच्या अडचणीचा दोष कोणाला द्यावा ? असा प्रश्न मला केला. मी सुद्धा थोडा अंतर्मुख झालो. मी त्यांना एक गोष्ट
सांगितली. ती होती मुर्त्यांच्या दोन दगडांची.
एक शिल्पकार डोंगरात जावून दगड शोधतो. त्यापासून परमेश्वराची मूर्ती तयार
करायला तो टाकीचे घाव घालायला सुरवात करतो. तेव्ही दगडाला वाटते ही काय शिक्षा आहे.
हा शिल्पकार उगाच आपल्यावर घाव घालतो आहे. दगड मनातून रागवलेला असतो. काही
कारणामुळे तो शिल्पकार तो दगड सोडून देतो व पुढे जातो. दगडला वाटते बरे झाले. थोडे
पुढे गेल्यावर त्या शिल्पकाराला दुसरा दगड दिसतो. शिल्पकार तेथे बसून दगडातून
मूर्ती घडवतो. या दगडालाही त्रास होतो. पण त्याला आनंद असतो की, आपल्याला नवा आकार
मिळतोय. तो दगड टाकीचे घाव सहन करतो. कालांतराने मूर्तीकाराचे काम पूर्ण होते. तो
परमेश्वराची सुंदर मूर्ती तयार करून पुढे जातो.
जवळच्या गावातील लोक एकदा
डोंगराजवळ येतात. ते परमेश्वराची सुंदर मूर्ती पाहतात. चमत्कार समजून मूर्ती सोबत
नेतात. गावाजवळ मंदिर बांधून त्या मूर्तीची गाभाऱ्यात स्थापना करतात. मंदिराच्या
बाहेर नारळ फोडायला एक दगड हवा असतो. ते पुन्हा दोडंराकडे जातात. तेथे
मूर्तीकाराने अर्धवट घडविवेला दगड त्यांना दिसतो. ते त्या दगडाला उचलून येतात. त्याची
मंदिराबाहेर स्थापना होते. आता दगडांची गंमत येथे आहे. ज्याने टाकीचे घाव सहन केले.
तो परमेश्वराची मूर्ती होवून मंदिरात बसला. लोक त्याची पूजा करायला लागले. मात्र, ज्याने
चाकीचे घाव चुकविले. त्याला मंदिराच्या बाहेर पडून आयुष्यभर नारळ फोडायचा घाव सहन
करावा लागला.
हे उदाहरण सांगून मी त्या
मुलीला सांगितले की, आपण आपल्या कोणत्याही स्थितीचा दोष हा दुसऱ्याला द्यायचा नसतो.
आपल्याला स्वतःला घडवून घेण्याची संधी मिळाली की थोडे सहनशिल होवून सहन करावे. कालातंराने
आपल्यालाही चांगले दिवस पाहाता येतात. असा प्रकारच्या समुपदेशनाने त्या मुलीचा
दृष्टीकोन बदलला. प्रतिक्रिया देताना तीने तसे बोलून दाखवले. ती म्हणाली, यापुढे
मी माझ्या अडचणीसाठी कोणालाही दोष देणार नाही. मी नेहमी टाकीचे घाव झेलण्याचा
प्रयत्न करीत राहिन.
कोणत्याही मुला-मुलींशी
संवाद साधताना आयुष्यात त्यांनी कोणते लक्ष, उद्दिष्ट किंवा ध्येय ठरविले आहे ?
याचीही चौकशी करून त्यांन मार्गदर्शन करावे लागते. बहुतांश पाल्यांचे
लक्ष निश्चित नसते. ते भरकटलेले असतात. अथवा काय करावे ? हे त्यांना समजत नाही. अशा मुलांच्या समुपदेशनासाठी मी अजून एक
गोष्ट सांगतो. ती थोडी विनोदी आहे. मात्र, मुलांना योग्य तो संदेश देण्यासाठी
पुरेशी आहे.
मी मुलांना दोन गाढवांची गोष्ट सांगतो. डोंबारी
आणि परीटाकडे गाढव असतात. परीटाच्या गाढवाला ठरलेल काम करावे लागते. त्याच्या
अंगावर दिवसभरात दोनवेळा ओझे टाकले जाते. सकाळी कपडे धुण्याचे आणि दुपारी
धुतलेल्या कपड्याचे ओझे नेण्याचे. डोंबाऱ्याच्या गाढवाला मात्र सर्व कुटुंबाचे ओझे
घेवून गावोगाव भटकावे लागते. एकदा या दोघा गाढवांची भेट होते. परीटाचा गाढव म्हणतो,
“अरे मला बघ से कमी काम आहे. दिवसभारात
दोनदाच मी ओझे नेतो. तुला मात्र खुप ओझे नेवून गावोगावी जावे लागतो. तू हे का सहन
करतो ?” त्यावर डोंबाऱ्याचा गाढव म्हणतो, “अरे या डोंबाऱ्याची पोरगी रोज जेव्हा दोरीवर चढते
तेव्हा तो डोंबारी म्हणतो, पोरी
नीट खेळ कर. जर पडली तर या गाढवाशी तुझे लग्न लावून देईन. मी आजही या आशेवर आहे की
ती एक दिवस नक्की पडेल आणि माझ्याशी त्या
पोरीचे लग्न लावून देईन” मुले ही गोष्ट ऐकून खुप
हसतात. पण, लक्ष काय असते याचे नेमका अर्थ त्यांना समजतो. डोंबाऱ्याचा गाढव पोरीशी
लग्न करायचे लक्ष ठेवून ओझे वाहतो. परीटाचा गाढव केवळ दोन वेळचे ओझे वाहायचे समजून
तेच ते काम करतो. असा फरक मी समजून सांगतो. त्याचा परिणामही मुलांवर उत्तमपणे होतो.
संवादानंतर अनेक मुले भेटतात आणि दोन्ही गोष्टी आवडल्याचे सांगतात.
शालेय मुलांशी असाच
मनमोकळा संवाद करणे आज गरजेचे आहे. तरच त्यांचे समुपदेशन योग्य दिशेने होते. त्यांच्या
पौगंडावस्थेच्या प्रांरभी होणारे समुपदेशन त्यांना भावी युवावस्थेत परिश्रमातून
निश्चित लक्ष साध्य करण्याची उमेद देते. मला वाटते साच प्रकारच्या संवाद, गोष्टीतून
मुलांना नेमका संदेश देतो येतो.
Comments
Post a Comment